तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी एक अनोखी आणि लक्षवेधी योजना जाहीर केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला सरकारकडून 1 ग्रॅम सोन्याची अंगठी भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरात या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन आता प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सत्तेत आल्यास प्रत्येक नवजात बाळासाठी सरकार 'मामा'ची भूमिका बजावेल आणि त्याला सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. आता ही घोषणा प्रत्यक्षात साकारली जाणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, या योजनेचा अधिकृत शुभारंभ 15 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हा दिवस माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीचा आहे. मात्र, योजना 22 जूनपासूनच लागू मानण्यात येणार आहे. कारण 22 जून हा मुख्यमंत्री विजय यांचा वाढदिवस आहे.
तमिळनाडूमध्ये 'थैमामन सीर' ही सांस्कृतिक परंपरा प्रचलित आहे. या परंपरेनुसार, कुटुंबातील मामाकडून नवजात बालकाला भेटवस्तू दिली जाते. याच परंपरेला अनुसरून राज्य सरकार प्रत्येक बाळासाठी 'मामा'ची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी आदेशातही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सध्या बाजारातील सोन्याच्या दरानुसार, 1 ग्रॅम सोन्याच्या अंगठीची किंमत सुमारे 13 हजार 600 रुपयांच्या आसपास आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये जन्मणाऱ्या नवजात बालकांना ही भेट दिली जाणार आहे.
'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-६'च्या आकडेवारीनुसार, तमिळनाडूमध्ये दरवर्षी सुमारे 7.8 लाख प्रसूती होतात. यापैकी जवळपास 99.9 टक्के प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये होतात. त्यापैकी सुमारे 53 टक्के म्हणजेच 4.2 लाख प्रसूती सरकारी आरोग्य संस्थांमध्ये होतात. त्यामुळे या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी पालकांना सरासरी 1,364 रुपये खर्च येतो, तर खासगी रुग्णालयांमध्ये हा खर्च 63 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार स्वतंत्र 'स्टेट प्रोजेक्ट अँड प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट' स्थापन करणार आहे. ही संस्था योजनेचे नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन करणार आहे.
नवजात बालकांचे स्वागत करताना त्यांच्या जन्माची आठवण कायम राहावी आणि मातृत्वाचा आनंद अधिक विशेष व्हावा, हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.