पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून, विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. 293 पैकी तब्बल 207 जागांवर विजय मिळवत भाजपने बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या विजयानंतर सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून आज सकाळी 11 वाजता शपथ घेणार आहेत.
भाजपच्या या ऐतिहासिक विजयामुळे राज्यात मोठा जल्लोष सुरू असून, शपथविधी सोहळाही भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने राजकीयदृष्ट्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकूणच, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणे हा पक्षासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात असून, या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.