जालना: आज सकाळी अचानक आलेली एक दुःखद बातमी संपूर्ण राजकीय वर्तुळाला सुन्न करून गेली. राजकारणाच्या पटलावर स्वतंत्र ठसा उमटवणारे आणि जालना जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे एक धडाडीचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे आज (शुक्रवार, 1 मे 2026) पहाटे अचानक निधन झाले. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे जालना जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारची पहाट जेथलिया कुटुंबासाठी काळरात्र ठरली. पहाटेच्या सुमारास सुरेशकुमार जेथलिया यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जालन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रुग्णालयाच्या पायरीवर पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली.
सुरेशकुमार जेथलिया हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले आणि तळागाळात काम करणारे लोकप्रतिनिधी होते. परतूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तब्बल दोन वेळा आमदारकी भूषवली होती. सत्तेत असताना आणि नसतानाही त्यांचा जनसंपर्क नेहमीच दांडगा राहिला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी परतूर आणि मंठा परिसरात अनेक विकासकामे मार्गी लावून जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. 'लोकांचा नेता' अशी ओळख असलेल्या जेथलियांच्या निधनाने एका अभ्यासू नेतृत्वाला जिल्हा मुकल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
जेथलिया यांच्या राजकीय कारकिर्दीची मुळे काँग्रेस पक्षात रुजलेली होती. काँग्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी राजकारणाची मोठी खेळी खेळली आणि स्वतःचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांनुसार आणि राज्याच्या हिताचा विचार करत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. राष्ट्रवादीत आल्यानंतर ते पक्षाचे एक खंबीर आणि डॅशिंग नेते म्हणून नावारूपाला आले होते.
जालना जिल्ह्यासारख्या आव्हानात्मक राजकीय भूमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन निर्माण करण्यात आणि पक्षसंघटन मजबूत करण्यात जेथलिया यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, एक निष्ठावान संघटक हरपल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांच्या जाण्याने परतूर-मंठा परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.