मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून स्वत: ला प्रमोट करण्याचं काम सुरू आहे. व्यासपीठावरील नेत्यांचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. सर्वसामान्य जनतेच्या पैशावर हा कार्यक्रम सुरू करण्याचा नवीन जुमला या सरकारने सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम त्या व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्यासाठी केला जात आहे. गरीब मायबाप जनतेच्या पैशावर नवीन जुमला या सरकारने बांधला आहे. करदात्यांचे पैसे जाहीरातींवर खर्च केले जातात, कार्यक्रमासाठी करोडो रुपयांचा चुरडा करण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे शासन तुमच्या दारी द्या, ग्रामपंचायतीला द्या असं सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, ‘जयंत पाटील मंत्री असाताना त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पोहचण्याचे काम केलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर न करून स्व:ताचं प्रमोशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत केविलवाणा प्रयोग केला जात आहे.’