Supriya Sule Nashik: खरातवर टीका, फडणवीसांचं कौतुक; NDAसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या…

सुप्रिया सुळे यांनी शिक्षण, अंधश्रद्धा, महिला सक्षमीकरण, हुंडाबंदी, ड्रग्स आणि महाराष्ट्राच्या भवितव्यावर परखड भूमिका मांडली.

Supriya Sule Nashik: खरातवर टीका, फडणवीसांचं कौतुक; NDAसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज, शिक्षण, अंधश्रद्धा, महिला सक्षमीकरण आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. भाषणादरम्यान त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अंधश्रद्धेविरोधात कठोर भूमिका मांडली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुवाबाजीविरोधातील कारवाईचे जाहीरपणे कौतुक करताना राजकीय मतभेद आणि चांगल्या कामाचे समर्थन वेगळे असल्याचेही स्पष्ट केले.

सुळे म्हणाल्या की, समाजात समानता निर्माण करण्याचे सर्वात मोठे साधन म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणामुळेच सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. महाराष्ट्राच्या विकासात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून याची जाणीव माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अनेक वर्षांपूर्वी करून दिली होती.

हेही वाचा: Operation Tiger Photo Viral : ठाकरेंच्या खासदारांची ती गुप्त भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं होतं; घटनाक्रम उघड

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये स्पष्ट फरक असल्याचे सांगताना त्यांनी, "माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. मी पांडुरंगाकडे निवडणुकीत आमचे उमेदवार जिंकू दे अशी प्रार्थना करत नाही," असे स्पष्ट केले. नव्या पिढीमध्ये वाढणाऱ्या अंधश्रद्धेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

राज्यात वाढत चाललेल्या बुवाबाजीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत कौतुक केले. "आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे अनेक मुद्द्यांवर टोकाचे मतभेद आहेत. मात्र त्यांनी बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून अशा लोकांना तुरुंगात टाकले, हे स्वागतार्ह आहे. चांगल्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे," असे त्या म्हणाल्या.

महिला सक्षमीकरणाच्या विषयावर बोलताना त्यांनी घर सांभाळणाऱ्या महिलांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. घराबाहेर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा त्याग असतो, असे सांगत त्यांनी महिलांच्या श्रमांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूणहत्येवरही त्यांनी परखड भूमिका मांडली. "लेकींना शिक्षण द्या आणि हुंडा देणार नाही, असा ठाम निर्णय प्रत्येक कुटुंबाने घ्यायला हवा. जावयाला गाडी घेण्यासाठी पैसे देऊ नका, त्याने स्वतःच्या कष्टाने वाहन घ्यावे. अगदी लग्नासाठीही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीची अट घाला," असा संदेश त्यांनी दिला.

हेही वाचा: Parth Pawar Engagement: पार्थ पवार यांच्या आयुष्यात नव्या इनिंगची सुरुवात; 'या' काश्मिरी मॉडेलसोबत अडकणार लग्नबंधनात

युवकांना उद्देशून सुळे म्हणाल्या की, 21व्या शतकातील महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. ड्रग्सचे वाढते जाळे, अंधश्रद्धा आणि सामाजिक विकृती यांच्याविरोधात तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

राजकीय चर्चांवर भाष्य करताना त्यांनी मिश्कील शैलीत, "आम्हाला रोज एका नवीन पक्षात पाठवले जाते. फक्त मनसेमध्येच अजून पाठवले नाही," असे म्हणत उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरवली. "आम्ही फुटण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर धोरणे ठरवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आलो आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे आपण व्यथित असल्याची भावना व्यक्त करत, अशा अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number