राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात निवडणूक लढवणार नसल्याची स्पष्ट भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. गरज भासल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, पण कुटुंबातील व्यक्तींविरोधात राजकीय सामना करणार नाही, असे सांगत त्यांनी मोठे विधान केले.पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. विशेषतः विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडीतील समन्वय, बारामतीचे राजकारण आणि आगामी निवडणुकांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पवार कुटुंबाविरोधात निवडणूक नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांच्या कुटुंबातील पवार आडनावाच्या व्यक्तींविरोधात त्या कधीही निवडणूक लढणार नाहीत. कुटुंबीयांमध्ये राजकीय लढाई व्हावी, अशी माझी इच्छा नाही. जर अशी वेळ आली तर मी दुसरा मतदारसंघ शोधेन आणि तेथून लोकांची सेवा करेन, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, मला देशाची सेवा करायची आहे. मतदारसंघ बदलण्याची वेळ आली तरी हरकत नाही, पण घरातील व्यक्तींविरोधात उभे राहणे योग्य वाटत नाही. कुटुंबातील संघर्ष सार्वजनिक पातळीवर जाणे हे कोणत्याही सुसंस्कृत घरासाठी योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीवर विश्वास
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी ही केवळ राजकीय युती नाही, तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेली शक्ती आहे. तिन्ही पक्ष समंजसपणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. सर्व निर्णय समन्वयातून घेतले जातात. एका जागेसाठी वाद वाढवण्यापेक्षा परस्पर समजुतीने मार्ग काढणे महत्त्वाचे आहे.
अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया
महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, हा निर्णय सर्वांनी चर्चेनंतर घेतला आहे. प्रत्येक पक्षाचा सन्मान राखत निर्णय होणे गरजेचे असते. त्यामुळे या निर्णयात कोणताही वाद पाहण्याचे कारण नाही.
बच्चू कडूंबाबत प्रतिक्रिया
बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार असतो. कोणाला उमेदवारी द्यायची किंवा कोणाला पक्षात घ्यायचे, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही.
बंगाल आणि राष्ट्रीय राजकारणावर मत
पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. निकालानंतर चित्र स्पष्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर वक्तव्य
अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून तपास पूर्ण करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला हवा.