मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सध्या चर्चा सुरू आहे. जुन्या आणि अनुभवी नेत्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं आहे. तर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचादेखील पत्ता कट झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार हे राष्ट्रीय सरचिटणीस तर जय पवार हे राष्ट्रीय सचिव असतील. पवार कुटुंबामध्ये संघटनात्मक सत्तेचं केंद्रीकरण पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळलं गेल्याचं दिसल्यानं हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. पटेल यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले खासदार आणि पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय चेहऱ्यांपैकी एक असलेले सुनील तटकरे यांनासुद्धा राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्त न केल्याचं पाहायला मिळत आहे. तटकरे 2022 पासून या पदावर आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणी पत्रानंतर पक्षांतर्गत पुन्हा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. नव्या कार्यकारिणीत पक्षातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेसारख्या दिग्गज नेत्यांना वगळण्यात आल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची एक्स पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. “माध्यमांमध्ये फिरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये टाइपिंग एरर असून ती लवकरच दुरुस्त करण्यात येईल, अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी शेअर केली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले, ज्यात 13 जणांची नावं त्यांची पदं असलेलं आणि खुद्द सुनेत्रा पवार यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रात टाइपिंग मिस्टेक कशी असू शकते, यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. कारण यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अशीच टाइपिंग चूक झाली असल्याची घटनेचीच पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिम यादी कोणती हे पाहणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे.
A list of office bearers of the NCP circulating in the media has a clerical mistake and will be corrected soon. — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026