पुण्यात आता भटक्या कुत्र्यांपाठोपाठ भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यात येणार आहे. भटक्या मांजरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं हा निर्णय घेतलाय. तो मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आलय. मात्र याला प्राणिप्रेमींनी विरोध केलाय.
मांजर हा पाळीव प्राणी असला तरी त्याला सगळ्यांचाच लळा असण्याचं कारण नाही.
त्यामुळे काही ठिकाणी त्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलं जातं तर काही ठिकाणी त्याला हातात काठी घेऊन हुसकावलं जातं.
अशा परिस्थितीत भटक्या मांजरांची संख्या वाढतेय आणि त्यातून त्यांचा उपद्रवही वाढतो.
हा उपद्रव कमी करण्यासाठी शहरातील मांजरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची मोहीम पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलीय.
मांजराच्या लसीकरणावर तसंच नसबंदीवर महापालिकेतर्फे सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
शहरातील कुत्री तसंच मांजरांचा कंत्राटी पद्धतीनं बंदोबस्त करण्यात येणार आहे.
शहरातील प्राणीप्रेमींनी मात्र या योजनेला विरोध केलाय. मांजराची नसबंदी केल्यानं उंदरांची संख्या वाढून प्लेगचा धोका वाढणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.
पुण्यासारख्या शहरात मांजर हा अनेकदा वादाचा विषय ठरलेला आहे. मांजरांवरून उद्भवलेली काही प्रकरणं तर कोर्टकचेऱ्यांपर्यंत गेली आहेत. अशावेळी महापालिकेच्या या नवीन मोहिमेतून काय साधलं जाणार याबद्दल उत्सुकता आहे.