नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार कालावधी पूर्वीपेक्षा एक दिवस वाढवण्यात आला आहे. आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते जोमाने प्रचार सभांना उपस्थित राहण्यासाठी कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशीच एक व्हिडीओ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
शिर्डीतील अहिल्यानगरमधील एका सभेला पोहोचण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धावाधाव पाहायला मिळाली आहे. संगमनेर येथे काल निवडणुक प्रचारार्थ महायुतीची सभा होती. संगमनेर येथील कालच्या प्रचार सभेत अवघे पाच मिनिटे शिल्लक असताना एकनाथ शिंदेंची सभास्थळी पोहचण्यासाठी धावाधाव पाहायला मिळाली.
हा शिर्डी विमानतळावरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. आदर्श आचारसंहितेची वेळ मर्यांदा पाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांचेसह पोलिस प्रशासनाचीही धावपळ झाली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.