नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले. तीर्थक्षेत्र विकासावर सरकारचे विशेष लक्ष असून, माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या आणि स्कायवाॅक करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सात कोटी रुपये मंजुर झाले आहेत. मार्च महिन्यात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी माहुरला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी शुक्रवारी नांदेडमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. रेणुकादेवीचे हे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. माहूर गडाच्या पायथ्यापासून शे-सव्वाशे दगडी पायऱ्या चढल्या की, रेणुका मातेचे मंदिर दृष्टीपथास येते. येथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग विलोभनीय वाटतो.