बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर दुसरीकडे राजकीयवर्तूळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे भाषण करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करु नये, असं आवाहन केलं. या मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- PMC Election 2026 : आंदेकर कुटुंबातील महिलांना उमेदवारी, अजित पवारांची सारवासारव; म्हणाले, 'एकाने गुन्हा केला म्हणून…'
यावेळी तानाजी सावंत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय असते? शिवसैनिक काय असतो? गद्दारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते? हे आम्ही त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. जिल्हा परिषद आली काय आणि गेली काय, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यासाठी जन्मलो नाही. आमचं ब्रीद वाक्यच आहे की 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. 80 टक्क्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली. पाऊस पडला, काही ठिकाणी वाडी-वस्त्यांसह रस्त्यावर जाता येत नाही. तेव्हा आम्ही स्वखर्चाने रस्ते केले. समोरचा एक नेता दाखवा, ज्याने स्वखर्चांने एक रस्ता केला, मी आता राजीनामा देतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जर तिकीट वाटपावरून एकमेकांवर खुन्नस काढण्याचा प्रयत्न केला, तर मी जबाबदार पदाधिकाऱ्यांना सांगतो, पिशवीतील अस्त्र काढा तो पुन्हा तीन-चार वर्ष नीट जगता कामा नये".
"त्याचा बंदोबस्त सर्व शिवसैनिकांनी करायचा आहे. सत्ता आल्यानंतर ज्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समीतीचा सदस्य व्हायचंय ठीक आहे ना, काहींना कंत्राट वैगेरे करायचे ना, माझ्याकडे या, मी या ठिकाणी आहे ना. तुला सेवा करायचीय? मला माहिती नाही का तुला कोणती सेवा करायचीय? माझ्या केबिनमध्ये गुपचूप ये आणि सांग, साहेब मला तिकीट देऊ नका, पण मला पाच वर्षांसाठी हे-हे लागतंय. तुला रुपया लागतोय? मी दोन रुपये देतो. पण निवडणुकीत त्याचं प्रामाणिकपणे काम कर, गद्दारी करायची नाही. जर गद्दारी केली तर त्याला ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हे इथेच नाही तर संपूर्ण जिल्हा परिषदेत सांगतो. यावेळेस धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा झेंडा फडवायचा आहे" असा मोठा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.