Middle East Conflict: मध्य-पूर्वेतील शांततेचे प्रयत्न धुळीस मिळवत शनिवारी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने दोन व्यापारी जहाजांवर भीषण गोळीबार केला. ब्रिटीश लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या नौदलाने एका तेल टँकरला थेट लक्ष्य केले आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सागरी मार्ग पुन्हा एकदा युद्धभूमी बनला आहे.
काय घडले नेमके?
बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर शनिवारी आठ तेल टँकर्सचा एक मोठा ताफा हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत असताना इराणने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर इराणने संपूर्ण सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा कडक लष्करी नियंत्रण लागू केले आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती केलेल्या नाकेबंदीचा हा बदला असल्याचे तेहरानने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांची भूमिका आणि इराणचा संताप
विशेष म्हणजे, इराणने कालच हा सागरी मार्ग सर्व जहाजांसाठी खुला करण्याची घोषणा केली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणसाठी नाकेबंदी सुरूच राहील" असे जाहीर केल्याने परिस्थिती चिघळली. अमेरिकेने विश्वासघात केल्याचा आरोप करत इराणने अवघ्या 24 तासांत आपला निर्णय फिरवला. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी शत्रू राष्ट्रांना इशारा दिला असून, इराणचे नौदल कोणत्याही संघर्षासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
शांतता कराराचा अल्टिमेटम आणि वाढती चिंता
डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे शांतता कराराचे संकेत दिले असले तरी, दुसरीकडे त्यांनी बुधवापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर बुधवारपर्यंत ठोस करार झाला नाही, तर पुन्हा युद्ध सुरू होईल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. सध्या असलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम संपत आल्याने आणि इराणने आक्रमक पवित्रा घेतल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.