तिरंगी लढत, आयाराम-गयारामांची डोकेदुखी आणि बंडखोरी; सोलापूर मनपातील कोणते मुद्दे चर्चेत?

सोलापूर महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म वाद, बंडखोरी, इनकमिंग-आऊटगोईंग आणि ठिय्या आंदोलनामुळे राजकीय तापमान वाढले आहे. तिरंगी व बहुकोनी लढतींमुळे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

तिरंगी लढत, आयाराम-गयारामांची डोकेदुखी आणि बंडखोरी; सोलापूर मनपातील कोणते मुद्दे चर्चेत?

रवी ढोबळे, प्रतिनिधी; सोलापूर: सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म, इनकमिंग-आऊटगोईंग, बंडखोरी आणि ठिय्या आंदोलन यामुळे सोलापूरचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून अनेक जण भावुक झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास टोकाची भूमिका घेण्याचे इशारे देण्यात आले. एका भाजप इच्छुकाने तर उमेदवारी दिली नाही तर अंगावर पेटवून घेण्याचा इशाराच दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान भाजप नेतृत्वासमोर उभे राहिले आहे.

दरम्यान, भाजपच्या एबी फॉर्म सादरीकरणावरून सोलापुरात मोठा राजकीय गोंधळ उडाला. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपच्या एबी फॉर्मवर आक्षेप घेत निवडणूक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर एबी फॉर्म सादर करण्यासाठी कार्यालयात दाखल होत असताना विरोधी व मित्र पक्षांच्या उमेदवारांनी त्यांना प्रवेशद्वारातच अडवले. जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.

या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एबी फॉर्म वेळेत आणि नियमांनुसार सादर केल्याचा दावा केला. मात्र विरोधकांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे पिटीशन दाखल केली आहे. निवडणूकच थांबवण्याची मागणी करत सर्वपक्षीय नेत्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली असून प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि संतोष पाटील यांनी संपूर्ण परिवार व पॅनलसह भाजपमध्ये प्रवेश केला. एक दिवस आधीच मशाल चिन्हाचे एबी फॉर्म घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या ४० वर्षांपासून वानकर परिवार ठाकरे समर्थक म्हणून ओळखला जात होता. अचानक झालेल्या या प्रवेशामुळे उद्धव सेनेत खळबळ उडाली आहे.

एबी फॉर्म वादामुळे दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम राहिला. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना कार्यकर्त्यांनी अक्षरशः पळवत निवडणूक कार्यालयात आणले. प्रभाग क्रमांक १३ मधील एबी फॉर्ममधील चुकांमुळे भाजपच्या दोन इच्छुकांमध्ये जोरदार राडा झाला. या गोंधळात शहराध्यक्षांना चक्कर येऊन पडल्याचीही घटना घडली.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या २६ प्रभागांमध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार याचे चित्र स्पष्ट झाले असून जवळपास सर्वच प्रभागांमध्ये बहुकोनी आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (शिंदे व ठाकरे), एमआयएम, मनसे, माकप, बसपा, सपा, प्रहार वंचित आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

एकूणच एबी फॉर्म वाद, बंडखोरी, इनकमिंग-आऊटगोईंग, आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे सोलापूर महापालिका निवडणूक राजकीय रणधुमाळीत बदलली असून, निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयोग कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number