सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्जच थेट बाद झाला आहे. सोलापूर विधान परिषद काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्या असल्याचा आक्षेप घेत भाजपने काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर हरकत घेतली. यानंतर काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचे नाव आणि स्वाक्षरी होती. मात्र आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावरील स्वाक्षरी त्यांची नसल्याचा खळबळजनक दावा नागेश भोसले यांनी केला. यानंतर नागेश भोसले यांच्यावर दबाव असल्याचा दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप फत्तेपूरकर यांच्याकडून समोर आणण्यात आली. तर नागेश भोसले यांनी काँग्रेसचे आरोप खोडून काढले असून काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर बनावट सही केली असल्याची माहिती दिली.
तसेच माझी बोगस सही करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईसाठी कोर्टात जाणार असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फत्तेपूरकर या दोघांचीही बाजू सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतर नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे पाहून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद केला.
दरम्यान सोलापूर विधान परिषद निवडणुकीत एकूण 7 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. यामध्ये भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख,शिंदेसेनेचे बंडखोर रमेश बारस्कर, शिंदेसेनेचे बंडखोर महेश साठे, शिवसेने उबाठा बंडखोर नागेश अक्कलकोट, शिवसेना उबाठा बंडखोर धनंजय डिकोळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जीवन जानकर हे आता मैदानात असणार आहेत.