महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रासाठी मंगळवारी लिलाव पार पडला. यामध्ये एकूण ५ संघांनी ८७ खेळाडूंवर बोली लावली आणि यासाठी सुमारे ५९.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या लिलावात भारतीय खेळाडूंसोबतच ३० विदेशी खेळाडूंनाही खरेदी करण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघाची सुपरस्टार सलामीवीर स्मृती मंदानाने इतिहास रचला आहे. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात तिच्यावर सर्वाधिक बोली लागली आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिच्यावर बोली लावली. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. तिला ३.४० कोटी रुपयांना आरसीबीने विकत घेतले. आरसीबीला त्यांचा कर्णधार मिळाला आहे. स्मृतीची बेस प्राइस ५० लाख रूपये होती. ४ मार्चपासून महिला प्रीमियर लीग सुरु होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स संघाला त्यांचा कॅप्टन मिळाला आहे. स्मृती मानधना आरसीबीची कॅप्टन बनू शकते. सध्या स्मृती टीम इंडियाची उपकर्णधार आहे. स्मृतीने भारतासाठी ४ टेस्ट, ७७ वनडे आणि ११२ टी-20 सामने खेळले आहेत. यात टी-२० मध्ये तिने २६५१ धावा केल्या आहेत तर वनडे स्मृतीच्या नावावर ३०७३ धावा आहेत. टीम इंडियाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचे नावही महागड्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. दीप्तीला लिलावात २.६० कोटी रुपये मिळाले. जेमिमा रॉड्रिग्जवरही चांगलीच किंमत लादण्यात आली. तिला दिल्ली कॅपिटल्सने २.२० कोटी रुपयांना विकत घेतले. बेथ मुनीला गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले. शेफाली वर्माला दिल्लीने २ कोटी रुपयांना विकत घेतले.
भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर होती. कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे. यामध्ये बिग बॅश आणि वूमन हंड्रेडचा समावेश आहे.
स्मृती मंधाना ही जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाजांपैकी एक आहे. या खेळाडूकडे ११२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ज्यात तिने आपल्या बॅटने २७.३२ च्या सरासरीने २६५१ धावा केल्या आहेत. मंधानाच्या नवे २० अर्धशतकेही केली आहेत. मंधानाचा टी-२० आंतरराष्ट्रीय स्ट्राईक रेट १२३ पेक्षा जास्त आहे.