Electricity Saving Tips: महिन्याच्या शेवटी येणारं वाढलेलं वीज बिल अनेकांसाठी चिंतेचं कारण ठरत आहे. विशेषतः उन्हाळ्यात एसी, फॅन, कूलर यांचा वापर वाढल्याने बिलही वाढतं. मात्र, काही छोट्या सवयी बदलून तुम्ही सहजपणे तुमचं लाईटबिल कमी करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही मोठा खर्च किंवा तांत्रिक बदल करण्याची गरज नाही. फक्त रात्री झोपण्यापूर्वी काही उपकरणं बंद करण्याची सवय लावली, तरी मोठी बचत होऊ शकते.
घरात वापरात नसतानाही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं सतत वीज वापरत असतात. यालाच ‘स्टँडबाय पॉवर’ असं म्हणतात. टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, वाय-फाय राऊटर आणि मोबाईल चार्जर्स ही उपकरणं बंद असली तरी प्लगमध्ये असतील, तर त्यातून वीज खर्च होतच राहतो. त्यामुळे या उपकरणांचा वापर नसताना त्यांचे प्लग काढून ठेवणे फायदेशीर ठरते.
सर्वप्रथम टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सबद्दल बोलायचं झाल्यास, हे उपकरणं बंद केल्यानंतरही स्टँडबाय मोडमध्ये राहतात. त्यांच्या सर्किटमधून सतत वीज वापरली जाते, जी वर्षभरात मोठ्या रकमेपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे रात्री झोपताना या उपकरणांचे प्लग काढून ठेवले, तर वीजेची बचत होऊ शकते.
याशिवाय वाय-फाय राऊटरही अनेक घरांमध्ये 24 तास सुरू ठेवला जातो. पण रात्री झोपताना त्याचा वापर होत नसल्याने तो बंद ठेवला, तर विजेची बचत होतेच, शिवाय राऊटरचे आयुष्यही वाढते. यामुळे इंटरनेटशी जोडलेली उपकरणंही अनावश्यक बॅटरी खर्च टाळू शकतात.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल किंवा इतर उपकरणांचे चार्जर्स. अनेकदा आपण चार्जर सॉकेटमध्ये लावून ठेवतो, जरी फोन चार्जिंगला नसेल तरी. हे चार्जर्स सतत वीज घेत राहतात. जरी हा वापर कमी वाटत असला, तरी वर्षभरात त्यातून होणारा खर्च लक्षणीय असतो.
तज्ञांच्या मते, या छोट्या सवयी अंगीकारल्यास दरवर्षी शेकडो ते हजारो रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे वीज बिल कमी करण्यासाठी मोठे उपाय शोधण्यापेक्षा अशा साध्या सवयी अंगीकारणं अधिक फायदेशीर ठरतं. रोजच्या आयुष्यातील या छोट्या बदलांमुळे तुमचं वीज बिल कमी होऊ शकतं आणि त्याचवेळी ऊर्जा बचतीतही तुमचा हातभार लागतो.