शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकीकडे बंड होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विविध पदावरील कार्यकर्ते, नेते मंडळीदेखील पदाचा राजीनामान देताना पाहायला मिळत आहे. पक्षाचे अनेक खासदार नेतृत्वावर नाराज असून ते बाहेर पडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच काल दिल्लीमध्ये घडलेल्या अत्यंत वेगवान घडामोडींनंतर ठाकरे गटाचे तब्बल 7 खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खासदार थेट आपला एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले गेल्याचे बोलले जात आहे. जर ही शक्यता खरी ठरली, तर लोकसभा निवडणुकीनंतर स्थिरावू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असू शकतो. या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनही सूचक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, या घडामोडींवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना थेट नाव न घेता महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
दीपक केसरकर म्हणाले की, “बाळासाहेबांचे असे विचार होते की, ते कधीच कॉंग्रेसमध्ये विलीन नाही होणार. तशी कधी वेळ आलीच तर ते पक्ष बंद करून टाकतील असं ते स्वत: देखील म्हणाले आहेत. सध्याची स्थिती पाहता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली चालणारी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटातील खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ऑपरेशन टायगरला हे नाव देण्यात आले कारण वाघ हे शिवसेनेचे चिन्ह आहे”.
“शिवसेना दिवसेंदिवस आपली ताकद वाढवत आहे. जे मोठ-मोठे नेते आहेत ते शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक ताकदवान होत आहे. संजय राऊत हे त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतू महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे आपलं उत्तम काम दाखवत आहेत. जे इतर पक्षातील नेत्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आकर्षित करत आहे. जर भविष्यात असं होणार असेल तर ते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.”