Shivray Kulkarni: राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका ट्विटमधून कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासावर टीका करत खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
शिवराय कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटमध्ये बच्चू कडू यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्याचा आरोप केला. उमेदवारी न मिळाल्यावर पक्ष सोडणे, हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवणे, सत्तेसाठी वेगवेगळ्या भूमिका घेणे, तसेच राजकीय फायद्यासाठी विविध समाजघटकांची नावे पुढे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
■ उमेदवारी मिळाली नाही, सेना सोडली. हिंदुत्व सोडले. मतांसाठी दाढ्या कुरवाळल्या. आमदारकी मिळवली.
■ मंत्रीपद हवे होते तर सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवून, लव जिहादचे समर्थन करत, नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजीवर टीका करून, बि ग्रेडी विचारांची मांडणी करत मविआत मंत्रीपद मिळवले
■ सत्ताबदल… pic.twitter.com/6WTElcVLBj — Shivaray Kulkarni (@ShivarayK) April 30, 2026
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आमदारकी आणि सत्तेसाठी कुठेही, केव्हाही, काहीही करण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. मंत्रीपदासाठी विविध विचारधारांशी जवळीक साधली, तर सत्ताबदलाचे संकेत मिळताच वेगळे निर्णय घेतले, असा दावा त्यांनी केला. तसेच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने दाखवत राज्यभर प्रचार केला, अशीही टीका करण्यात आली.
याचबरोबर कुलकर्णी यांनी बच्चू कडू आता मित्रपक्षात आल्याचे म्हणत त्यांचे स्वागतही केले. “आता आमच्या मित्रपक्षात आला आहात, तर मित्रासारखे वागा. भगव्याचे इमान राखा,” असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवराय कुलकर्णी यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे स्वागताच्या नावाखाली टोलेबाजी असल्याचे म्हटले, तर काहींनी मित्रपक्षातील अंतर्गत नाराजीचे संकेत मानले आहेत. सोशल मीडियावरही या ट्विटची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
बच्चू कडू यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटासोबत त्यांची नवी राजकीय वाटचाल कशी राहणार, तसेच या टीकेला ते काय उत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील शब्दयुद्ध अधिक तीव्र होताना दिसत असून, आगामी काळात अशा राजकीय टोलेबाजीला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.