शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादेत पोलखोल सभा होणार आहे. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. केंद्र सरकारविरोधात शिवसेनेची पोलखोल सभा पार पडणार असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
मराठवाड्यात शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना ८ जून १९८५ रोजी झाली. त्यामुळे या शाखेच्या ३७व्या वर्धापनाचेनिमित्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे ८ जून रोजी औरंगाबादेत शिवसेनेची सभा पार पडणार आहे.
औरंगाबादेतील शिवसेना सभेच्या पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यातील सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या सभेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. बैठकीत मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैर, अर्जुन खोतकर आणि जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. यांच्यासह मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीसुद्धा बैठकीला हजेरी लावली.
त्यामुळे आता ८ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या औरंगाबादेतील पोलखोल सभेत शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.