महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेत्याने केलेल्या वक्तव्याने महायुतीतील राजकारण पुन्हा खवळून निघाल आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडेल असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. भविष्यात पक्षाचे संख्याबळ वाढल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्रिपदावर नक्कीच दावा सांगेल, असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.
त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट प्रतिक्रिया देत शिवसेना नेत्यांनी महायुतीतलं वातावरण बिघडवू नये असा इशारा दिला आहे. दरम्यान प्रवीण दरेकर म्हणाले की, “आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. माझी नेत्यांना अशी सुचना देतो आणि विनंती करतो की असा वाद निर्माण नाही झाला पाहिजे. कारण शेवटी मुख्यमंत्रीपद हे संख्याबळावर होत आणि महायुती एकत्रित निर्णय घेत असते. मला वाटत कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करण महायुतीसाठी हिताचं नाही. संख्याबळ आलं तर दावा करु शकतात. आज तरी ही स्थिती नाही, 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत हीच वस्तुस्थिती आहे. त्यामळे जर संख्याबळ जास्त आणलं तर दावा करण्याचा अधिकार सगळ्यांकडेच आहे.”
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक यांच्या टीकेवर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “महायुतीमध्ये वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. राहिला मुद्दा क्लस्टरचा…एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली. ठाण्यात चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे. नवी मुंबईत पण गणेश नाईक यांनी ही योजना राबवावी. सर्वसामान्य यांचा फायदा…गेली अनेक वर्ष नवी मुंबई महापालिका गणेश नाईक यांच्या हातात त्यावर मला फार बोलायचं नाही. संख्याबळ महत्त्वाची 2022 ची परिस्थिती वेगळी आता वेगळी… संख्याबळ वाढली तर नक्की मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करू.”