मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे शिंदेंनी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर आणि दादा भुसे उपस्थित होते. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजपालांनी या राजीनाम्याचा स्विकारला आणि नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्तीचे पत्र राज्यपालांनी त्यांना दिला. शपथविधी होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या सूचना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना दिल्या.
30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसनेतील 40 आमदारांना सोबत घेत सत्तेत गेले होते. विधान परिषदेची निवडणुक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले होते. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रिपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.