BMC Election 2026: शिंदेंची ‘घराणेशाही’ की…? मुंबई महापालिका निवडणुकीत बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचाच दबदबा

घराणेशाहीच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे.

BMC Election 2026: शिंदेंची ‘घराणेशाही’ की…? मुंबई महापालिका निवडणुकीत बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचाच दबदबा

मुंबई: "आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत," असा ढोल वाजवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाने मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र स्वतःच 'घराणेशाही'चे मॉडेल राबवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबईतील महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या 90 जागांवर उमेदवारी देताना, शिंदेंनी पक्षाच्या अनेक बड्या आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांनाच मैदानात उतरवले आहे. यामुळे पक्षासाठी घाम गाळणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करताना निष्ठावान माजी नगरसेवकांवर विश्वास दाखवला असला, तरी दिग्गज नेत्यांच्या घरातच उमेदवारीची माळ टाकली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली शेवाळे, तर माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया अशा दोघांनाही उमेदवारी देऊन कुटुंबाचे वर्चस्व राखण्यात आले आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय आणि चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे यांनाही उमेदवारी देऊन 'घराणेशाही'ला बळ देण्यात आले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: वसईमध्ये राजकारण तापलं ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या ताफ्यासमोरच निष्ठावंताचा संताप

केवळ पत्नी किंवा भावजयच नव्हे, तर पुढच्या पिढीलाही राजकारणात स्थिरावण्यासाठी या निवडणुकीचा उपयोग केला जात आहे. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर आणि भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रूपेश पाटील यांना मिळालेली उमेदवारी याचेच निदर्शक आहे. चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी तर आपल्या घरातील तन्वी आणि समृद्धी या दोघींना उमेदवारी मिळवून देऊन 'डबल धमाका' केला आहे. याशिवाय, यामिनी जाधव आणि पल्लवी सरमळकर यांच्या रूपाने जुन्या राजकीय घराण्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना 90 तर भाजप 137 जागांवर लढत असताना, काही प्रभागांमध्ये युतीतच ठिणगी पडली आहे. प्रभाग क्र. 225 मध्ये भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भावजय हर्षिता नार्वेकर यांना मैदानात उतरवले आहे, तर शिवसेनेने सुजाता सानप यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागात दोन्ही बाजूने 'घराणेशाही'चेच उमेदवार असल्याने युतीचा अधिकृत चेहरा कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच येथील चित्र स्पष्ट होईल.

एकनाथ शिंदे यांनी बंड करताना 'घराणेशाही' हा मुख्य मुद्दा बनवला होता. मात्र, आता महापालिका निवडणुकीत स्वतःच्याच आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने, ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी पक्ष फोडताना आणि संघटना उभी करताना साथ दिली, त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घराणेशाहीला विरोध हा केवळ टीकेपुरता मर्यादित राहिला असून, सत्तेच्या समीकरणात मात्र 'नातेवाईक'च प्रथम स्थानी असल्याचे या उमेदवारी यादीवरून अधोरेखित होत आहे.

हेही वाचा: Dhurandhar Record in North America : उत्तर अमेरिकेत 'धुरंधर'चा नवा विक्रम, शाहरुख खानच्या 'पठाण'ला टाकले मागे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number