ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. शिंदे गटाच्या संपर्कात काही खासदार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच पक्षाचे अनेक खासदार नेतृत्वावर नाराज असून ते बाहेर पडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे तब्बल 7 खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून हे खासदार थेट आपला एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले गेल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे गट आणि शिंदेंच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेने जोर धरून ठेवला आहे. अशातच शिंदे गटातील नेते संजय निरुपम हे मराठी भाषा मुद्द्यावरून चर्चेत होतेच. दरम्यान सध्या राज्यात सुरु असलेल्या ठाकरे गटातील पक्षांतर्गत बंडावर आणि खासदारफूटीवर शिंदे गटातील नेते संजय निरुपम मोठं भाकित केलं आहे. 2029 येईपर्यंत ठाकरे गट पूर्णपणे संपुष्टात येईल असं भाकित संजय निरुपम यांनी केलं आहे. तसेच ऑपरेशन टायगर हे माध्यमांनी दिलेलं नाव आहे, आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. असं देखील मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यावेळी संजय निरुपम म्हणाले, “ऑपरेशन टायगर हे माध्यमांनी दिलेलं नाव आहे, आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. दुसरं म्हणजे उबाठा नावाचा पक्ष हळूहळू नाहीसा होत आहे. ठाकरेंच्या नेतृत्त्वावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास नाही राहिलाय. त्यामुळे 2029 येईपर्यंत हा पक्ष पूर्णपणे संपुष्टात येईल. कारण, रोज पक्षातील नेते उद्धाव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर अविश्वास दाखवत आहेत आणि पक्ष सोडून जात आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर एक बैठक बोलवली होती. त्यांनीच सुरु केलेल्या ऑनलाईन बैठकीला त्यांचेच खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळे असं दिसून येतं की, यांच्या पक्षात असंतोष आहे. या असंतोषाचा परिणाम काय होईल हे तर मला माहित नाही. पण हा पक्ष हळूहळू संपुष्टात येऊन या पक्षातील लोक पक्ष सोडून जातील. “
“ठाकरे पक्षातून जाणारे लोक जातायत कारण, ठाकरे पक्षात चालणारे नेतृत्त्व हे खूप अहंकारी आहे. त्यांचे नेतृत्त्व त्यांच्या पक्षातील खासदार आणि आमदारांना एक्सेसेबल नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे पक्षाचं नेतृत्त्व करणारे दोन्ही नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे दोघेही घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे या पक्षात असणारे खासदार आणि आमदार स्वत:चे भविष्य राखून ठेवण्यासाठी या पक्षासोबत आपलं नातं तोडत आहेत. आता पक्ष सोडल्यानंतर ते कुठे जाणार हे त्यांना ठरवायचं आहे आम्ही हे नाही ठरवू शकतं.”