मुंबई : महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे तणाव वाढलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर आले. मात्र, या भेटीतही दोघांमधील दुरावा स्पष्ट जाणवत होता. दिव्यज फाऊंडेशनच्या गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र उपस्थित होते, परंतु त्यांचा संवाद अत्यंत मर्यादित राहिला.
कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम पोहोचले. काही वेळानंतर एकनाथ शिंदे मंचावर आले. फडणवीसांनी उभे राहून शिंदेंना नमस्कार केला आणि बाजूच्या खुर्चीवर बसण्याचे संकेत दिले. शिंदेंनीही नम्रपणे अभिवादन केले, पण फडणवीसांच्या अगदी शेजारच्या दोन खुर्च्या रिकाम्या ठेवून त्यांनी थोड्याशा अंतरावर जाऊन बसणे पसंत केले. या मोकळ्या खुर्च्या मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तरीही, या अंतरामुळे दोघांमधील सध्याच्या तणावाची झलक जाणवल्याचे उपस्थितांना प्रकर्षाने जाणवले.
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांत चांगलेच तापलेले आहे. ठाणे, डोंबिवली, पालघर आणि नवी मुंबई परिसरात भाजपकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूला करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरली. या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते, परंतु त्यातून तणाव कमी झाल्याचे चित्र कुठेच दिसत नाही.
अलीकडेच पाटण्यात झालेल्या नितीशकुमार यांच्या शपथविधी कार्यक्रमातही दोन्ही नेत्यांचा थंड प्रतिसाद चर्चेत राहिला होता. कार्यक्रमाला वेगवेगळ्या मार्गाने पोहोचलेले शिंदे आणि फडणवीस समोरासमोर आले तेव्हा औपचारिक नमस्कारापुरताच संवाद मर्यादित राहिला. शिंदेंनी केवळ हात जोडून उत्तर दिले, मात्र चेहऱ्यावर कोणताही भाव न दिसल्याने त्यांची नाराजी अजून कायम असल्याची चर्चा पुन्हा तीव्र झाली. मुंबईतील हुतात्मा स्मारकावर झालेल्या कार्यक्रमावेळीही असेच दृश्य पाहायला मिळाले. या सर्व प्रसंगांमुळे महायुतीतील तणाव सध्या सर्वांसमोर आलेला दिसतो. भाजपच्या वाढत्या राजकीय हालचालींवरून शिंदे गट नाराज असल्याची चर्चा जोर धरत असून, आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील आणि पक्षांमधील समीकरणे कशी बदलतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहणार आहे.