Chopada Election : चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीत मित्रपक्षांतील मतभेद उफाळून आले असून, राजकीय मैत्रीतूनच घाव घातल्याचे चित्र उभे राहिले आहे. वरवर एकमेकांना साथ देण्याचे आश्वासन देणाऱ्या घटकपक्षांनीच निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाशी हातमिळवणी केल्याचं चित्र पाहायला मिळतय. राज्यातील अनेक नगरपालिका निवडणुकांमध्ये अशीच राजकीय उलथापालथ दिसून येत आहे आणि चोपडा नगरपालिका त्याला अपवाद राहिलेली नाही.
अचानक बदललेले राजकीय गणित
चोपड्यात महायुतीच्या नावाने एकत्र लढण्याची चर्चा रंगत असतानाच समीकरणांमध्ये मोठा फेरबदल झाला. शिवसेना शिंदे गटाने अनपेक्षित पाऊल उचलत भाजपकडे पाठ फिरवली आणि थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केली. नगराध्यक्ष आणि 31 नगरसेवक पदांसाठी त्यांनी एकत्रित पणे उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे आघाडीच्या स्वरूपात रिंगणात उतरले आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटानेच काँग्रेससोबत मैत्री करणे हा जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.
हेही वाचा – Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर नाराजी कायम; सभेत अंतर ठेवून बसले, कारण काय?
भाजपने संवादच साधला नाही – आमदार सोनवणे
या अनपेक्षित युतीमागचे कारण स्पष्ट करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, 'आम्हाला महायुतीतच निवडणूक लढवायची होती. मात्र भाजपने आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही, चर्चा केली नाही. आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष केले,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोनवणे पुढे म्हणाले, 'मित्रपक्ष फक्त स्वतःचा फायदा पाहणार असेल, तर आम्हालाही आमच्या अस्तित्वासाठी योग्य निर्णय घ्यावा लागतो. म्हणूनच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला.' तसेच, परिस्थितीनुसार कठोर भूमिका घ्यावीच लागते, अन्यथा राजकीय अस्तित्व धोक्यात जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्यासोबत राहील
दरम्यान, नवीन युतीमुळे राजकीय वातावरण तापले असले, तरी निवडणुकीत विजयाबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे, असेही सोनवणे म्हणाले. मतदारसंघात केलेले काम आणि विकासाची कामे जनतेसमोर आहेत. त्याच जोरावर निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.