मुंबई: राज्यातील आगामी नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र न्यूज सोबत खास संवाद साधत ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे नेते प्रचारात कुठेही दिसले नाहीत, याकडे लक्ष वेधत त्यांनी म्हटले की, “मला वाटते त्यांनी पराभव आधीच मान्य केला होता. त्यामुळेच ते मैदानात उतरले नाहीत.”
महानगरपालिका निवडणुकांबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाकरे बंधू राज्यभर कुठेही प्रचारसभा घेत नाहीत. “ते लोकांना फसवू शकतात, पण स्वतःला फसवू शकत नाहीत. कदाचित त्यांना आपला पराभव स्पष्टपणे दिसत असावा आणि त्यांनी तो मनातून स्वीकारलेला असावा,” असा टोला त्यांनी लगावला.
युद्धाच्या उपमेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “युद्धाला जाताना शस्त्रांना धार लावून जायला हवी. पण इथे तर शस्त्रच टाकलेली दिसत आहेत.” या शब्दांतून त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
ठाकरे बंधूंची पुढची पिढी राजकारणात उतरून शाखा कार्यालयांना भेट देत प्रचार करत असल्यावरही उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यातून नेमके काय साध्य होणार आहे, हे मला माहित नाही. त्यांनी घराघरात जाऊन प्रचार केला पाहिजे. अशा वेळी लोकांबरोबर रस्त्यावर उतरून प्रचार करणे, लोकांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक असते. मात्र ठाकरे बंधूंचे नवे नेते आणि नवी पिढी शाखा कार्यालयांत बसलेली दिसते,” अशी टीका त्यांनी केली.
आपल्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही सत्तेत असताना राज्याच्या विकासासाठी जे काम केले आहे, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. विकासाला प्राधान्य देणारी ही जनता आहे.”
मुंबईच्या बाबतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “मुंबईत विकासकामांना प्राधान्य देऊनच जनता मतदान करेल आणि ते मतदान आमच्याच बाजूने असेल,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Pune News : पुण्यात निवडणूक रणधुमाळीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला; ‘हे’ कारण समोर