मेंढपाळाच्या मुलाचे ‘UPSC’चे स्वप्न पूर्ण; बिरदेव डोणेचं संघर्षमय यश 

कोल्हापूरच्या यमगे गावातील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे युपीएससीत 551वी रँक मिळवत अधिकारी बनला; जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी.

मेंढपाळाच्या मुलाचे  ‘UPSC’चे स्वप्न पूर्ण; बिरदेव डोणेचं संघर्षमय यश 

कोल्हापूर: इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सांगणारे जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील  यमगे गावातील बिरदेव सिद्धप्पा डोणे. घरात कोणतीही सोय नाही, आर्थिक परिस्थिती बेताची आणि वडील मेंढपाळ असतानाही, अधिकारी बनण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवलेला हा युवक अखेर 'युपीएससी'सारख्या कठीण परीक्षेत देशात 551वा क्रमांक मिळवत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

बिरदेव डोणेचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारण्यात गेले. अभ्यासासाठी जागा नव्हती, त्यामुळे गावातील शाळेच्या व्हरांड्यात अभ्यास केला. शैक्षणिक वातावरण दूरचं, पण त्याच्या मनात अधिकारी होण्याची जिद्द लहानपणापासून होती. गावातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचे वेड डोक्यात घेऊन तो दिल्लीला गेला. दोन वर्षांची तयारी करूनही पहिल्या दोन प्रयत्नात त्याला अपयश आले. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा पुण्यात येऊन अभ्यास सुरू ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशात 551वी रँक मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं.

हेही वाचा:खरबूजाच्या बिया फेकल्याने होऊ शकते ३ हजार रुपयांचे नुकसान

बिरदेव डोणे हा धनगर समाजातील आहे. सतत गावोगावी फिरावे लागते, त्यामुळे अभ्यास करणेही खूप मोठे आव्हान होते. पण अभ्यासाची ओढ, जिद्द आणि चिकाटी यामुळेच तो यात यशस्वी झाला. रिझल्ट आल्यावर खूप आनंद झाला. एक मेंढपाळाचा मुलगा असा अधिकारी बनू शकतो हे पाहून आनंदच झाला. अभ्यास करताना खूप अडचणी होत्या पण बकऱ्या राखण्याच्या कष्टांपेक्षा अभ्यास चांगला वाटायचा,असं  बिरदेव म्हणाला.

बकरी राखणं हे आता सहज शक्य नाही, शेतकरी शेताच्या बांधावर येऊ देत नाहीत, गडी मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीकडे वळण्याची गरज बिरदेव यांना लवकर जाणवली. मिळालेल्या यशामुळे त्यांनी आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची ताकद मिळवली आहे. या यशाने संपूर्ण गावाचं, समाजाचं, आणि विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील तरुणांचं मनोबल वाढवलं आहे. हे यश केवळ वैयक्तिक नाही तर एक सामाजिक प्रेरणा आहे. कितीही परिस्थिती वाईट असली तरी जर तुमच्याकडे ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही ती परिस्थिती बदलू शकता, असं बिरदेव ठामपणे सांगतो.

बिरदेव डोणेच्या यशाची ही कथा ग्रामीण भारतातील लाखो युवकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. शिक्षणाचं बळ घेऊन कुठल्याही पार्श्वभूमीतून यशाकडे वाटचाल करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number