मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच, ठाकरे गटाला दक्षिण मुंबईतून मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आणि युवासेनेच्या कोअर कमिटीतील आक्रमक नेत्या शीतल देवरुखकर-शेठ यांनी शिवसेनेला (UBT) 'जय महाराष्ट्र' केला आहे. गेल्या दोन दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या एका महिला पदाधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेला हा राजीनामा ठाकरे गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल देवरुखकर या मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 51 मधून निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ इच्छुक होत्या. मात्र, जागावाटपाच्या गणितात त्यांना डावलण्यात आले. युवासेनेच्या स्थापनेपासून आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या देवरुखकर यांना संधी न मिळाल्याने त्या कमालीच्या नाराज होत्या. राजकारणात 'गॉडफादर' नसताना स्वबळावर सिनेट सदस्य आणि उपनेतेपदापर्यंत पोहोचलेल्या नेत्याला डावलणे पक्षाला महागात पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
आपल्या राजीनामा पत्रात शीतल यांनी अत्यंत जड अंतःकरणाने भावना व्यक्त केल्या आहेत. 2003 पासून म्हणजेच तब्बल 22 वर्षे त्यांनी शिवसेनेच्या विविध पदांवर काम केले. राजीनामा देताना त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी पत्रातील शब्द "प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने काम केले" हे त्यांच्या मनातील खदखद स्पष्टपणे दर्शवतात. पक्षात कार्यरत असताना मिळालेल्या संधींबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असली, तरी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांनी घेतलेला हा निर्णय आदित्य ठाकरेंसाठी वैयक्तिक धक्का मानला जात आहे.
शीतल देवरुखकर आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, भाजप आता त्यांच्या माध्यमातून प्रभाग 51 मध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची तयारी करत आहे. भाजपच्या या 'इनकमिंग'मुळे मुंबईत ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात पडझड झाली आहे. विशेषतः सिनेट निवडणुकीत आणि युवा मतदारांमध्ये शीतल यांचा असलेला प्रभाव भाजपला फायदेशीर ठरू शकतो.
एकापाठोपाठ एक जुने आणि निष्ठावान शिलेदार सोडून जात असल्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर 'बंडखोरी' रोखणे आणि 'निष्ठावंतांना' सांभाळून घेणे हे मोठे आव्हान असतानाच, युवासेनेच्या कोअर टीममधील नेत्याचे जाणे कार्यकर्त्यांचे नीतीधैर्य कमी करणारे ठरू शकते. शीतल देवरुखकर यांच्या पक्षप्रवेशानंतर आता प्रभाग 51 मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, येथे भाजप विरुद्ध ठाकरे गट असा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल.