पुणे: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे मत मांडले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सुनेत्रा पवारांना संधी मिळाली, याचा मला आनंद आहे.” मात्र, शपथविधीच्या विषयावर अधिक भाष्य करणे शरद पवार यांनी टाळले.
शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान प्रांगणातील प्रस्तावित स्मारकाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, “या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे. सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.”
हेही वाचा: Rohit Pawar Tweet: ‘मा. अजितदादांचा अवमान करणारी…’ रोहित पवार संतापले; नेमकं प्रकरण काय?
संसदेतील उपस्थितीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्या 58 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत कधीही गैरहजेरी राहिलेली नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनामुळे मी दिल्लीतील चालू अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही.” केंद्रीय अर्थसंकल्पावर मत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की, “या अर्थसंकल्पातून विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या स्वरूपाची ठोस मांडणी अर्थसंकल्पात दिसून आलेली नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “जोपर्यंत या अपघाताबाबतची अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही.” दरम्यान, गौतम दानी यांनी पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. “दुःखाच्या या काळात ते पवार कुटुंबासोबत सहभागी आहेत,” असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “या विषयावर बोलण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना नाही,” असे त्यांनी यादरम्यान सांगितले.