मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान नेहमीच आपल्या शैलीने प्रेक्षकांना भुरळ घालतो. पण यावेळी तो चर्चेत आला तो एका पुरस्कार सोहळ्यातील त्याच्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणामुळे. मुंबईत झालेल्या ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2025’ या कार्यक्रमात शाहरुखने हजेरी लावली आणि उपस्थितांच्या मनात आदर निर्माण करणारे शब्द उच्चारले. या भाषणात त्याने भारतीय सैनिकांच्या धैर्याचं मनापासून कौतुक केलं. त्याचसोबत 26/11 दहशतवादी हल्ला, पहलगाम हल्ला आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटातील निष्पाप बळींना श्रद्धांजली अर्पण केली.
शाहरुख म्हणाला, “या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्या राष्ट्रासाठी प्राणपणाने लढलेल्या शूर सुरक्षा दलांना मी आदरपूर्वक सलाम करतो.” कार्यक्रमात पुढे बोलताना शाहरुखने सैनिकांप्रती काही खास भावना व्यक्त केल्या. त्याचे शब्द इतके प्रभावी होते की सभागृहात उपस्थित प्रत्येकाला भावनिक केले.
शाहरुख म्हणाला, “जेव्हा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही काय करता, तेव्हा अभिमानाने सांगा की ‘मी देशाचं संरक्षण करतो.’ कमाई किती विचारली तर हसत उत्तर द्या ‘मी 1.4 अब्ज लोकांचा आशिर्वाद कमावतो.’ आणि भीतीबद्दल प्रश्न आला तर नजरा भिडवून सांगा ‘भीती त्यांना वाटते, जे हल्ला करतात.’” याच पुढे तो म्हणाला की, शांतता हीच खरी शक्ती आहे. “जात, धर्म, मतभेद विसरून आपण सर्वांनी शांततेच्या दिशेने चाललं पाहिजे. आपल्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. भारतात जर शांतता मजबुतीने उभी असेल, तर या देशाला कोणीही हादरवू शकत नाही,” असे भावनिक शब्द शाहरुखने व्यक्त केले.
या भाषणाच्या शेवटी किंग खानने भारतीय जवानांच्या समर्पणाला सलाम केला आणि भारतीयांच्या एकतेचे कौतुक करत उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला. शाहरुख खानचं हे प्रेरणादायी भाषण आणि मनोरंजनाने भरलेला त्याचा प्रवास हे दोन्ही मिळून त्याला ‘किंग’ का म्हणतात, याची पुन्हा एकदा प्रचिती देऊन गेले.