ऐन महानगपालिका निवडणुका तोंडावर असताना महायुतीला मात्र धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकतीच सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची अर्ज मागे घेण्याच्या वादावरून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यानंतर आता अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला.
यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आलं आहे. हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर खुनाचे प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल.
हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर आता खुनाचे गुन्हे दाखल होतात का?, याकडे लक्ष लागले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते हिदायत पटेल मृत्यू प्रकरणी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले असता त्यांच्या परिवाराने आक्रमकता दाखवली. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात येईल असा इशारा मृतक हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.