मुंबई: शेअर बाजारात झटक्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या जाहिराती आणि कोर्सवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर आपणही अशाच प्रकारच्या प्रचारावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले असतील, तर सावधान राहणं आवश्यक आहे. बाजार नियामक सेबीने अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग ॲकॅडमीविरुद्ध कठोर कारवाई केली असून जवळपास 601 कोटी रुपयांची वसुली प्रक्रिया सुरू केली आहे. या आदेशामुळे अवधूत साठे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे.
सेबीला काही महिन्यांपासून अनेक ऑनलाइन कोर्स, वेबिनार आणि गुंतवणूक सल्ले देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर संशय होता. या पार्श्वभूमीवर अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीची तपासणी करताना नियामकांनी गंभीर अनियमितता उघड केल्या. कोर्स आणि लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून कोणतीही नोंदणी नसताना गुंतवणुकीचे थेट सल्ले दिले जात असल्याचं स्पष्ट झालं. नियमानुसार असा सल्ला फक्त सेबी नोंदणीकृत सल्लागारांनाच देता येतो. परिणामी सेबीने 601 कोटी आणि त्यावरील व्याजाची रक्कम का परत मागू नये, यासाठी नोटीस जारी केली आहे.
सेबीच्या तपासात आणखी धक्कादायक तथ्ये समोर आली. लाईव्ह सेशन्समध्ये विशिष्ट स्टॉक्ससाठी खरेदी-विक्रीचे स्तर, स्टॉप लॉस, टार्गेट्स आणि मोठ्या नफ्याचे दावे खुलेपणाने सांगितले जात होते. एवढंच नव्हे, तर WhatsApp ग्रुप्समध्येही भ्रामक संदेश पाठवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येत होतं. कोणताही कायदेशीर परवाना नसताना दिलेला हा सल्ला थेट नियमांचे उल्लंघन असल्याचं सेबीने स्पष्ट केलं. सेबीने केवळ नोटीस पाठवून थांबले नाही, तर तातडीचा अंतरिम आदेश देत अवधूत साठे आणि त्यांच्या सर्व संबंधित संस्थांना शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. यानुसार ते आता खरेदी-विक्री, बाजाराशी निगडित व्यवहार किंवा कोणताही आर्थिक सल्ला देऊ शकणार नाहीत. ही कारवाई गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
या प्रकरणातून गुंतवणूकदारांना एक मोठा धडा मिळतो. शेअर बाजारातील कोणताही सल्ला, फसवणारा प्रचार किंवा भावनिक संदेश पाहून स्वीकारू नये. परवाना नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेली टिप धोकादायक ठरू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागार सेबी नोंदणीकृत आहे का, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अचानक मोठा नफा मिळेल अशी अपेक्षा निर्माण करणारे कोर्स, दावे आणि व्हिडिओ यांच्यापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.
बाजारात कमाईची संधी आहे, पण योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय घेतलेले निर्णय मोठ्या तोट्याचं रूप धारण करू शकतात. या घटनेनंतर गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढणे अत्यावश्यक आहे. फसवे प्रचार, अवास्तव आश्वासने आणि नियमबाह्य सल्ल्यापासून स्वतःला वाचवणं ही सुरक्षित गुंतवणुकीची पहिली पायरी आहे.