ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशात शिरकाव केला आहे. तसेच राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता अखरे उद्यापासून मुंबईतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेची घंटा वाजणार आहे.
मुंबईतील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळा उद्यापासून सुरू होणार असून शाळेबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच उद्यापासून पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याचे लेखी आदेश या पूर्वीच दिले असल्याची माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांची राजू तडवी यांनी दिली आहे.
मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण होणे अनिर्वाय आहे. तसेच शाळेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश देऊ नये. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्य जास्त असल्यास शाळा दोन सत्रांमध्ये घ्याव्यात. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी.