सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या मुलींचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली आहे. हीना सत्तार, उजमा सत्तार अशी सत्तार यांच्या मुलींची नावं आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत. राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परिक्षेचा पेपर फुटल्याच समजलं होतं. तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टी. ई. टी. परिक्षेत गैरव्यवहार झाल्याच समोर आलं होतं.
दोन दिवसांपुर्वी २०१९ साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या ७८०० बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचं सांगितलं होतं.