सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माण-खटावचे नेते अभय जगताप आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बॅकअप प्लॅन तयार करण्यात आला आहे. एकाच मतदारसंघात दोन उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एकटे अभय जगताप आपला अर्ज दाखल करणार नसून त्यांच्यासोबत बाळासाहेब पाटील हे देखील अर्ज दाखल करण्यात आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
एकाच पक्षाकडून दोन उमेदवार, कारण काय?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभय जगताप यांच्या खांद्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लढता येणार की नाही? याबाबत अभय जगताप यांच्याकडून कोणतचं स्पष्टीकरण आलेलं नाही.
तर दुसरीकडे वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास ऐनवेळी जगताप निवडणूक लढवण्यास असमर्थ ठरले, तर त्यांचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो ज्यामुळे पक्षाची जागा अडचणीत येऊ शकते असं नये म्हणून तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हा तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार असून जगताप यांच्या प्रकृतीकडे पाहता अंतिम निर्णय घेतला जाईल.