ऑपरेशन टायगरमधील 6 खासदारांच्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 8 दिवसांत ठाकरेंना हा मोठा धक्का दिला. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज देखील भरला आहे. यावेळी माझा राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती करत सचिन अहिर कामगार सेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सचिन अहिर सरचिटणीस पदावर कार्यरत होते. सचिन अहिर यांनी दिलेल्या धक्क्यानंतर आता विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत खालील 5 आमदार राहिले आहेत. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, “सचिन अहिर यांनी पक्षप्रवेश न करता शिवसेनेतच प्रवेश केला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उबाठामध्ये असलेला असंतोष दिसत आहे. आता याला उबाठाचे नेते काय नाव देतात ते पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे. आम्ही ऑपरेशन करण्याच्या आणखीन मानसिकतेत नाही, हे जे येतात, त्या ठिकाणी त्यांची मानसिकता ढासळललेली आहे. पक्ष नेतृत्व काय करतोय, कार्यकर्त्यांना तिथे काय सन्मान मिळतोय हे त्यांनी पाहिलं आहे. सचिन अहिर हे काही काल परवाचे कार्यकर्ता नाहीत. ते राज्यमंत्री राहिले आहेत, वरळी भागात त्यांचं एक वजन राहिलं आहे. आणि अशा कार्यकर्त्यांनाही दाबण्याचा जो काही प्रयत्न झाला होता, त्याचा हा स्फोट झाला आहे. आता आम्हाला हेच पाहायच आहे की, सचिन अहिर यांना काय ऑफर आल्या, ते विकले गेले का? त्यांच्यावर काय टीका होते, यासर्व गोष्टच उत्तर आम्हाला उबाठाकडून अपेक्षित आहे. आता वरळीमध्ये आके देखो म्हणारे आता वरळीमध्ये येणार नाहीत अशी स्थिती तिथे आहे. आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेत येतील असा आमचा अंदाज आहे.”
ठाकरे गटाचे विधान परिषदेत उरलेले 5 आमदार
1. अनिल परब
2. मिलिंद नार्वेकर
3. अंबादास दानवे
4. ज. मो. अभ्यंकर
5. सुनील शिंदे