मुंबई: काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी त्यांनी राजकारणातून तात्पुरता ब्रेक घेतल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. आज आजारातून बरे होत संजय राऊत यांनी दुसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारवर जोरदार निशाणा साधत राजकीय कमबॅक केला आहे.
विधिमंडळ आणि संसदेमधील कामकाजाचे गांभीर्य संपले असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, सध्या संसदेमधील चर्चेमध्ये जर अजूनही काही जान शिल्लक असेल, तर ती विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामुळे आहे. लोकशाही आजही जिवंत आहे, पण ती टिकवण्यासाठी मजबूत विरोधी पक्ष नेतेपदाची नितांत गरज आहे. संजय राऊत म्हणाले की, संसदेमध्ये विरोधी पक्षनेता असणे ही केवळ परंपरा नाही, तर ती संविधानाची आवश्यकता आहे. मात्र मागील दहा ते अकरा वर्षांत विरोधी पक्षनेता पदच अस्तित्वात राहू नये, अशा पद्धतीने निकालांची मांडणी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणातून करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षातील नेत्यांचा सातत्याने अपमान कसा करता येईल, हे मोदी-शाह पाहत आहेत, असे सांगत राऊत म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या राज्यात विधानपरिषद आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता पद रिक्त असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. हे सरकार विरोधी पक्ष नेत्यांना घाबरत असल्याचे स्पष्ट आहे. सरकारच्या चुका दाखवण्यासाठी विरोधी पक्षनेता पद हे लोकशाहीतील महत्त्वाचे साधन आहे. यादीचे संख्याबळ कमी असतानाही भाजपकडून विरोधी पक्षनेते नेमले गेले, याकडे लक्ष वेधत राऊत म्हणाले की, राहुल गांधी ज्या ठामपणे सरकारच्या चुका दाखवत आहेत आणि मुद्दे समोर आणत आहेत, त्यामुळे अमित शाह यांच्यासह सत्ताधारी गटातील सर्वजण घाबरलेले आहेत. वंदे मातरम् विषयावरील चर्चेदरम्यान भाजपसह अनेक आरएसएस पुरस्कृत संघटनांची वाचाही बंद झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.
पुढील अधिवेशनात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीतावर चर्चा व्हावी, अशी इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या लढ्यात कोणी नेमके काय योगदान दिले, याचा सोक्षमोक्ष होईल, असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या लढ्यात कुठेच नव्हता, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे सांगत राऊत म्हणाले की, विदर्भ वेगळा करण्याची मागणी होत असताना शिंदे गटातील एकही आमदार बोलताना दिसला नाही. बर्फाच्या गादीवर बसल्यासारखे थंड राहून शिंदे गटातील आमदार छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा व्हावा, असे स्वप्न कोणी पाहत असेल तर ते स्वप्न भंग पावेल, असे ठामपणे सांगत राऊत म्हणाले की, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसाच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या पक्षावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंचा पक्ष हा ‘मिंधा’ असून अमित शाह यांच्या सल्ल्याशिवाय ते काहीही करत नाहीत. अपमान सहन करूनही ते भाजपसोबत आहेत. अमित शाह देवेंद्र फडणवीस यांना चेकमेट करण्यासाठी एकनाथ शिंदेंना जवळ करत आहेत, असा स्फोटक आरोपही त्यांनी केला. भाजपच्या पाठबळावर आणि पैशांच्या जोरावर एकनाथ शिंदेंचा पक्ष सध्या राज्यात टिकून असल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली. आम्ही कोणाच्या विरोधात लढायचे, याबाबत अंतिम टप्प्यातील बैठका सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांनी आपल्या मुलाची बाजू घेऊ नये. हायकोर्टानेही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पार्थ पवार दोषी असणार आहेत, मात्र त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकूणच, आजारातून बरे होत घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करत आपली राजकीय धार कायम असल्याचे दाखवून दिले. विरोधी पक्षाची भूमिका, महाराष्ट्राचे हित आणि लोकशाही मूल्यांवर त्यांनी ठाम भूमिका मांडत आगामी काळात राजकारण अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.