मुंबई : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आणि घणाघाती आरोप करण्यात आले. पक्षफोड, भ्रष्टाचार, गुंडशाही, मंत्रिमंडळातील निर्णय आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.
भाजपचे नेते अमित शाह हे पक्ष फोडण्यात अत्यंत पटाईत असल्याचा थेट आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होतील की नाही, हे मला माहिती नाही, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे आता सोपं राहिलेलं नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे आणि खटला अजून पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत कोणालाही मंत्रिमंडळात घेणं हे पाप ठरेल आणि असं पाप फडणवीस करतील, असं मला वाटत नाही, असे राऊत म्हणाले. भ्रष्टाचार आणि गुंडशाही हा या सरकारला लागलेला काळा डाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी करत असून, शेवटी ते ‘मिंधे’ना संपवणार , असा दावा राऊत यांनी केला. माणिकराव कोकाटे यांचे सदनिका प्रकरण जुने असले तरी ते प्रकरण आता बाहेर आले असून, कोकाटेंनी स्वतः हे प्रकरण ओढून घेतलं आहे. माणिकराव कोकाटे ही हिट विकेट आहे असं म्हणत भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, म्हणूनच अमित शाह यांनी काल धनंजय मुंडेंना दिल्लीमध्ये भेट घेतली, असे राऊत म्हणाले.
राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार, या चर्चांबाबत बोलताना संजय राऊत यांनी ती शक्यता पूर्णपणे फेटाळली. भाजपचा पराभव अजित पवार कसा करणार? त्यांच्यात तशी हिंमत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जे भाजपसोबत आहेत, जे भाजपची पालखी खांद्यावर घेत आहेत, ते भाजपचा पराभव कसा करतील? या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे राऊत म्हणाले. दोन्ही पवार एकत्र येऊ शकत नाहीत, हे सगळे पक्ष अमित शाह यांचे आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांच्याशी युती करणे म्हणजे थेट भाजपशी युती करणेच असल्याचे माझे मत आहे, असे सांगत राऊत म्हणाले की, अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत. ते कायम भाजप आणि अमित शाह यांच्या पाठीशी उभे राहतील. ही त्यांची वैयक्तिक आणि कुटुंबाची मजबुरी आहे. अजित पवार हे तात्त्विक विचारांमुळे भाजपसोबत गेलेले नाहीत, तर स्वतःची आणि कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आज मी शरद पवार यांची भेट घेणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. आजारपणामुळे यापूर्वी त्यांना भेटता आले नाही, मात्र आज विविध राजकीय आणि राज्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्षही गिळंकृत करणार आहे, असा दावा करत विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील की नाही, याबाबतच मला शंका आहे, असे राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी वृक्षतोड आणि ड्रग तस्करीच्या मुद्द्यांवरही सरकारवर जोरदार आरोप करत, सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महायुतीसमोर नवे प्रश्न उभे राहिले असून, आगामी काळात या आरोपांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे असून, येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यांचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटण्याची शक्यता आहे.