मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भयाण शांतता असतानाच शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी एक असा ‘बॉम्ब’ टाकला आहे, ज्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सत्तावर्तुळात खळबळ माजली आहे. अजित पवार यांच्या निधनाचे दु:ख ओसरले नसतानाच, हा केवळ एक अपघात नसून त्यामागे एक मोठे आणि गहिरे षडयंत्र असल्याची शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे. अजितदादांच्या मृत्यूभोवती संशयाचे दाट धुके निर्माण करणारे अनेक दावे करत राऊतांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरच निशाणा साधला आहे.
“गरज सरो आणि वैद्य मरो” असाच काहीसा प्रत्यय सध्या राजकारणात येत असल्याचे राऊत यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते. राऊत यांनी दावा केला की, अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली ती केवळ त्यांच्यावरील कारवायांच्या फाईल्स बंद करण्यासाठीच. विशेषतः जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाचा घोटाळा आणि जप्तीचा विषय त्यात मुख्य होता. ज्या ‘सेफ पॅसेज’साठी दादा भाजपसोबत गेले होते, तो उद्देशच सफल झाला नाही. उलट, ती फाईल पुन्हा उघडून त्यांच्यावरील दबाव वाढवण्याचे तंत्र वापरले गेले.
या संपूर्ण प्रकरणात राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. संबंधित फाईल जेव्हा ‘क्लोज’ करण्यासाठी अमित शाहांच्या टेबलावर गेली, तेव्हा ती बंद करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, त्यावर ‘निगेटिव्ह शेरा’ मारून ती फाईल पुन्हा महाराष्ट्रात धाडण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी फाईल बंद न करण्याचे आदेश दिल्यानंतर, भाजपच्या स्थानिक मंत्र्यांकडून दादांना “तुमची फाईल अजून आमच्याकडे आहे,” अशा शब्दांत वारंवार जाणीव करून दिली जात होती, असा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
ज्या संरक्षणासाठी अजितदादांनी सत्तेत सहभाग घेतला, तेच मिळत नसल्याने त्यांची अवस्था “इकडे आड तिकडे विहीर” अशी झाली होती. राऊतांच्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून भाजप आणि अजित पवार यांच्यात एक शीत युद्धच सुरू होते. भाजपने आश्रय नाकारल्यामुळे आणि सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून दादांनी पुन्हा माघारी फिरण्याचा किंवा ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाचा फेरविचार सुरू केला होता. नेमक्या याच काळात या दुर्दैवी आणि रहस्यमय घटनांची मालिका सुरू झाल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले.
इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पद रित्या होतो आणि तरीही शांतता पाळली जाते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी पवार कुटुंबाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आमदार रोहित पवार हे कुटुंबातील जबाबदार सदस्य आहेत. जर कुटुंबाच्या मनात संशयाची पाल चुकचुकत असेल आणि त्यांचा सरकारी तपास यंत्रणांवर विश्वास नसेल, तर त्यांनी सत्य बाहेर आणण्यासाठी ‘खासगी गुप्तहेर’ संस्थेमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असे मत राऊत यांनी मांडले आहे.
सद्यस्थितीत माझ्याकडे एवढीच माहिती असून, हे प्रकरण इथेच संपणारे नाही, असे सूचक विधान करत संजय राऊत यांनी भविष्यातील आणखी काही स्फोटक बातम्यांचे संकेत दिले आहेत. अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ आणि त्याभोवती फिरणारे ‘फाईल’चे राजकारण महाराष्ट्राला अजून किती धक्के देणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.