राज्यात इंधन बचतीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत असताना, दुसरीकडे काही मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे पुन्हा एकदा सरकारी खर्च आणि इंधन वापराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टर दौऱ्याची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
मंत्री संजय राठोड यांनी नागपूरहून थेट पोहरादेवी येथे हेलिकॉप्टरने प्रवास केला. पोहरादेवी येथे सुरू असलेल्या बंजारा विरासत संग्रहालय आणि विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, केवळ आढावा बैठकीसाठी आणि पाहणीसाठी हेलिकॉप्टरचा वापर केल्यामुळे विरोधकांसह नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, या दौऱ्यावेळी मंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. तब्बल 20 ते 22 सरकारी वाहनांसह अनेक खासगी गाड्यांचाही ताफ्यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पोहरादेवी येथील दौरा पूर्ण झाल्यानंतर मंत्री संजय राठोड हे पुढील खाजगी कार्यक्रमासाठी यवतमाळकडेही हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण दौरा आणखी चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यात सध्या वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि खर्च कपातीचे मुद्दे ऐरणीवर असताना मंत्र्यांच्या अशा व्हीआयपी दौऱ्यांवरून सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “एका बाजूला जनतेला इंधन बचतीचे धडे दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला सरकारी दौऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर इंधन खर्च केले जाते,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विरोधकांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सरकारी पैशांचा आणि यंत्रणेचा वापर कितपत आवश्यक होता, याबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे, मंत्री राठोड यांच्या समर्थकांकडून हा दौरा अधिकृत आणि नियोजित असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या हेलिकॉप्टर दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मंत्र्यांच्या व्हीआयपी संस्कृतीवर चर्चा सुरू झाली असून, सरकारी खर्च आणि इंधन वापराबाबत अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याची मागणी होत आहे.