मुंबई: शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या ऑडिओमध्ये ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकासंदर्भात त्यांनी पुस्तक प्रकाशकाला काही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप केला जात आहे. घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल… अशी धमी सुद्धा त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना या कथित ऑडिओ क्लिपद्वारे दिली आहे. मात्र या प्रकरणावर आता स्वतः गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संजय गायकवाड यांनी सांगितले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ही संपादित (एडिट) करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आली आहे. 21 एप्रिल 2026 रोजी एका समारंभात त्यांच्या पत्नीला ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक वाचले असता, त्यातील मजकुराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गायकवाड यांच्या मते, पुस्तकात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला असून, त्यांच्या अस्तित्वावर आणि ओळखीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय होते की नव्हते, मराठा समाजाचे होते की नव्हते, असे प्रश्न उपस्थित करणे अयोग्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी संबंधित प्रकाशकांसोबत फोनवर संपर्क साधून जाब विचारला. “मी प्रकाशकांना विचारले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला? ‘छत्रपती’ असा सन्मानपूर्वक उल्लेख का नाही?” असे त्यांनी स्पष्ट केले. या संभाषणादरम्यान प्रकाशकाने आपण ब्राह्मण असल्यामुळे असे बोलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, “मला कोणाच्या जातीशी काही देणं-घेणं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी जाब विचारणारच.” फोनवरील संभाषणात समोरून डिवचले गेल्यामुळे आपण कडक भाषेत प्रतिक्रिया दिल्याचेही त्यांनी मान्य केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. अशा प्रकारची पुस्तके समाजात गैरसमज पसरवतात, त्यामुळे अशा साहित्यावर बंदी आणण्याचा विचार केला पाहिजे,” असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इतिहास, साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर चर्चा सुरू झाली आहे.