सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील तणाव यापूर्वीच चर्चेत आला होता, पण गुरुवारी रात्री माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकलेल्या अचानक छाप्याने आता या चर्चेला नवे वळण दिलेले दिसत आहे. कार्यालयाची सखोल तपासणी केल्याने शिंदे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
यंदाची सांगोला निवडणूक चुरशीची आणि कठीण समीकरणांनी भरलेली आहे. भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीने शहाजीबापूंना एकटे पाडले आहे. तरीही त्यांनी स्वतंत्रपणे प्रचारात उतरत मतदारांमध्ये स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. दिवसाच्या सत्रात सांगोल्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाजीबापूंवर थेट टीका टाळली असली, तरी शेकापसोबतच्या युतीबद्दल समाधान व्यक्त करून राजकीय संदेश दिला. याच वक्तव्याला प्रत्युत्तर देत शहाजीबापूंनी रात्री उशिरा विराट सभा घेतली. सभेनंतर काही तासांतच त्यांच्या कार्यालयावर छापा पडला आणि राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले.
या घडामोडींवर शहाजीबापूंनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. “आजारी असतानाही मी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि भाजपला 15 हजार मतांची आघाडी मिळवून दिली. पण विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपनेच आमच्याविरोधात शेकापचा उमेदवार पुढे केला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
छाप्यात नेमके काय सापडले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, मात्र पथकाने संपूर्ण तपासणी केल्याची पुष्टी मिळत आहे. त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचे छापे त्यांच्या इतर काही कार्यालयीन ठिकाणी पडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकाप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला एकत्र आणत त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत टाकले आहे.
भरारी पथकाचा छापा हा निवडणूक आचारसंहितेतील नियमित तपासणीचा भाग होता की राजकीय दबावाचा परिणाम, यावर चर्चेला अधिक वेग आला आहे. मात्र या कारवाईनंतर शिंदे सेना आणि भाजपमधील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला आहे. परिणामी सांगोला निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या स्पर्धेचे नवे रणांगण ठरत आहे.
हेही वाचा: Mumbai Local Train: मध्य रेल्वे विस्कळीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांचे हाल