सांगली: महाराष्ट्राच्या मातीचा थरार, परंपरेचा उत्साह आणि ग्रामीण शौर्याचं दर्शन घडवणारी देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत तासगावमध्ये अभूतपूर्व जोशात पार पडली! हजारो प्रेक्षकांच्या गगनभेदी जल्लोषात कोल्हापूरच्या शिरोळ येथील बाळू दादा हजारे यांच्या “हेलिकॉप्टर बैज्या” आणि भिलवडी (सांगली) येथील पाटील डेअरीच्या “ब्रेक फेल” बैलजोडीनं यंदाच्या स्पर्धेचं मानाचं विजेतेपद पटकावत फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली.
‘श्रीनाथ केसरी’ या नावानं प्रसिद्ध झालेल्या या शर्यतीचं आयोजन दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलं होतं. सुमारे अडीच हजारांहून अधिक बैलगाडा मालक सहभागी झालेल्या या महामेळाव्यानं सांगली जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा बैलगाडी संस्कृतीच्या नकाशावर झळकवलं आहे. तब्बल 500 एकर मैदानावर दिवसभर चाललेल्या या शर्यतींनी ग्रामीण महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण निर्माण केले. या वर्षीच्या बक्षीस यादीनं तर सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवल्या. दोन फॉर्च्युनर, दोन थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि तब्बल 150 हून अधिक दुचाक्या अशा कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या थरारक शर्यतीत शिवसेनेनं आपली शक्ती लावून उत्साहाला आणखी उधाण आणलं आहे. शर्यतीदरम्यान मैदानावर प्रचंड गर्दी उसळली होती. लाखो बैलगाडीप्रेमी, शेतकरी आणि ग्रामीण बांधव या पारंपरिक खेळाच्या साक्षीदार झाले.
यावर्षी विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे महिला बैलगाडी शर्यतीचं केले गेले आयोजन. ही शर्यत सुद्धा लवकरच पार पडणार आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाची लाट उसळली आहे. आता या भव्य शर्यतीचं बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयात पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार होणार आहे. या पारंपरिक खेळाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या मातीतील परंपरा आजही जिवंत आहे आणि तिचा जोश अजूनही अविरत धावत आहे!
हेही वाचा: भारतातील 'या' राज्याचा कठोर कायदा, दुसरे लग्न केल्यास होणार तुरूंगवास