Government Officer Beaten: संगमनेरमध्ये राडा; पंचायत समितीत अधिकाऱ्याला बेदम मारहाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पंचायत समिती कार्यालयात घुसून एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Government Officer Beaten: संगमनेरमध्ये राडा; पंचायत समितीत अधिकाऱ्याला बेदम मारहाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गुन्हा दाखल

संगमनेर: लोकशाहीत सरकारी कार्यालये ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांची मानली जातात. मात्र, याच कार्यालयांमध्ये जर राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींकडून ‘राडा’ संस्कृतीचा अवलंब होऊ लागला, तर कायद्याचा धाक राहिला कुठे? असाच काहीसा उद्विग्न करणारा आणि कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडला आहे. चक्क पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून एका सरकारी अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेतले आहे.

संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू असताना हा थरार रंगला. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याच्या राजकारणातील वजनदार प्रस्थ असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांनी त्यांच्या नऊ ते दहा साथीदारांसह थेट पंचायत समितीत प्रवेश केला. त्यांनी तिथे कार्यरत असलेल्या तालुका अभियान व्यवस्थापकाला काही समजण्याच्या आतच लक्ष्य केले आणि बाचाबाचीचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले.

एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्यानेच असा कायदा हातात घेतल्याने संगमनेर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी दिली आहे. 

हेही वाचा: रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशसच्या मोका येथे ‘महाराष्ट्र भवन’ विस्तारित वास्तूचा शिलान्यास

हल्ली कोणतीही घटना कॅमेऱ्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नाही. संगमनेर पंचायत समितीमधील हा संपूर्ण राडा आणि अधिकाऱ्याला करण्यात आलेली धक्काबुक्की कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह काही प्रत्यक्षदर्शींच्या मोबाईलमध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या व्हायरल व्हिडिओमुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले असून, राजकीय दबावाचा वापर करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याच्या या प्रवृत्तीवर नेटकऱ्यांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भरदिवसा घडलेल्या या निंदनीय प्रकारानंतर भयकंपित झालेल्या पीडित कर्मचाऱ्याने तातडीने संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेचे कथन केले. घटनेचे गांभीर्य आणि आरोपींची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली.

काल रात्री उशिरा शरद नाना थोरात आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनोळखी नऊ ते दहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्यासह मारहाण करणे आणि अन्य गंभीर कलमांन्वये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस याप्रकरणी कोणाला आणि केव्हा अटक करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे, एका तालुकास्तरीय शासकीय अधिकाऱ्याचा आणि थोरातांसारख्या बड्या राजकीय घराण्यातील व्यक्तीचा नेमका असा काय वाद झाला की प्रकरण थेट हाणामारीपर्यंत गेले? या मारहाणीमागे कोणते राजकीय वर्चस्वाचे किंवा कामाच्या अडवणुकीचे कारण दडले आहे, की यामागे काही वैयक्तिक आकस आहे, याचे गूढ अद्याप उकललेले नाही. संगमनेर शहर पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, कारण काहीही असले तरी अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हात उगारण्याची प्रवृत्ती खपवून घेतली जाता कामा नये, अशीच भावना आता सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: भोंदू बाबाच्या अटकेचा ‘तो’ थरार! आधी आमदारानेच माहिती दिली अन् मग खरातने उलटा डाव टाकला; वाचा ‘ऑपरेशन खरात’चे इनसाईड डिटेल्स

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number