मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या हायस्पीड कॉरिडॉरवर प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता 'इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या अत्याधुनिक प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग आला असून, 9 ते 13 जानेवारी दरम्यान महामार्गावरील काही ठराविक टप्प्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
एआय (AI) कॅमेऱ्यांची करडी नजर
या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील हाय-टेक कॅमेरे. हे कॅमेरे तब्बल एक किलोमीटर अंतरावरूनही वाहनाचा वेग आणि वाहनाच्या आतील हालचाली स्पष्टपणे टिपू शकतात. केवळ नंबरप्लेटच नाही, तर चालकाने सीटबेल्ट लावला आहे की नाही, गाडी चालवताना मोबाईलचा वापर सुरू आहे का, इथपासून ते चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्यापर्यंतच्या 17 प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनांवर हे कॅमेरे नजर ठेवणार आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता पळवाट उरणार नाही.
अमरावती पट्ट्यात कामाचा धडाका; रस्ता राहणार बंद
या दुसऱ्या टप्प्यांतर्गत अमरावती जिल्ह्यातील मांजरखेड, धोत्रा, वाढोना, खंबाळा, शहापूर खेकडी, पाचोड आणि देऊळगाव या सात महत्त्वाच्या ठिकाणी प्रणाली बसवण्याचे काम होणार आहे. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत नागपूर आणि मुंबई अशा दोन्ही दिशांच्या मार्गिका काही काळासाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या काळात समृद्धीवरून प्रवास करणाऱ्यांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष देऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
702 खांब आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्ष
संपूर्ण महामार्गावर एकूण 294 ठिकाणी 702 खांब उभारून त्यावर हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी 'आमने' येथे मुख्य एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय, दर 100 किलोमीटरवर एक अशी सात प्रादेशिक व्यवस्थापन केंद्रे सज्ज असणार आहेत. थळघाटातील बोगद्यासाठी इगतपुरी आणि आमने येथे स्वतंत्र देखरेख केंद्रे असतील, ज्यामुळे संपूर्ण 701 किमीचा मार्ग सुरक्षित होणार आहे.
महामार्ग बंदच्या वेळा काय आहेत?
महामार्गावरील विविध ठिकाणी देखभाल व तांत्रिक कामांसाठी पुढील काही दिवस वेळेवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी रोजी मांजरखेड व धोत्रा येथे मुंबई दिशेने दुपारी 3 ते 4, तर मांजरखेड येथे नागपूर दिशेने दुपारी 12 ते 1 या वेळेत वाहतूक थांबवण्यात येईल. 10 जानेवारी रोजी खंबाळा येथे मुंबई दिशेने दुपारी 12 ते 1, तर वाढोना येथे नागपूर दिशेने दुपारी 3 ते 4 वाहतूक बंद राहणार आहे. 12 जानेवारी रोजी पाचोड येथे मुंबई दिशेने दुपारी 12 ते 1, तर शहापूर खेकडी येथे नागपूर दिशेने दुपारी 3 ते 4 महामार्ग बंद ठेवण्यात येईल. तसेच 13 जानेवारी रोजी देऊळगाव व शहापूर खेकडी येथे मुंबई दिशेने दुपारी 12 ते 1, तर देऊळगाव येथे नागपूर दिशेने दुपारी 3 ते 4 या कालावधीत वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासाचे नियोजन वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अपघातांच्या पुनरावृत्तीला बसणार लगाम
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अतिवेग आणि मानवी त्रुटींमुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी ही 'आयटीएमएस' यंत्रणा मैलाचा दगड ठरणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा अपघात झाल्यास या प्रणालीद्वारे त्वरित मदत पोहोचवणे सोपे होणार आहे. विकासाच्या महामार्गावर आता शिस्तीचा 'स्पीड' राखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, जनतेनेही नियमांचे पालन करून सहकार्य करणे अपेक्षित आहे.