'कैसा हराया' म्हणाल्या आणि मुंब्य्राच्या नगरसेविका सहर शेख चर्चेत आल्या. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण शेख कुटुंब नॉट रिचेबल असल्याने मुंब्रामध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे या प्रकरणाची सखोल सुनावणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीवर समितीचा अधिकृत अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. हा अहवाल जर विरोधात गेला, तर सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात येऊ शकते, शिवाय कायदेशीर कारवाईचा बडगाही उगारला जाऊ शकतो. याच अहवालाच्या धास्तीने शेख कुटुंबीयांनी कमालीची गुप्तता पाळली असून ते मुंब्रामधून देखील गायब असल्याची चर्चा आहे.
ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.