कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. कोल्हापूरला सर्वाधिक तडाखा बसला आहे. या पुराने आपल्याला शिकवण दिली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीवाले राजकारण करत आहे. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते काय, अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. वर्ध्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आले होते. यावेळी खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले.
या पुराचं राजकारण करू नये. हे संकट निसर्गनिर्मित आहे. भविष्यकाळात असं संकट आल्यास सक्षमपणे तोंड देण्यासाठी नियोजन कराव लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या पुराशी देणंघेणं नाही. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी मोठ्या तडफेन करत आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. 2005 मध्ये त्यांच्या काळात पूर आला असता तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही.
राष्ट्रवादीचे नेते लोकांची मन भडकवण्याचं काम करत आहे. मदत करत नाही. मदत करायची असेल तर जनावरांना चारा पोचवा, एक दोन गाव दत्तक घ्या, गाव उभी करण्याची काम करा. 2005 मध्ये त्यांचं सरकार असताना किती मदत द्यायचे याचे आकडे यांनी जाहीर करावे. आम्ही मदत वाढवली आहे.
पण मदत न करता विभागात फिरायचं, भाषण द्यायची, मुलाखती देत फिरत आहे. पुढील आमदारकीच्या जागा कशा वाढतील, या दृष्टीन राष्ट्रवादीवाले काम करत आहेत. ज्यावेळी पूर आला तेव्हा आले असते, पाण्यात उतरले असते, चार दोन बोटी घेऊन आले असते तर स्वागत केलं असतं.
लोकांचे अश्रू पुसायचा त्यांचा कार्यक्रम नाही. लोकांची मन भडकवून सरकारविरोधी वातावरण तयार करायच काम राष्ट्रवादीवाले करत आहेत. शेतकऱ्यांचा पुळका आहे तर मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार का केला, तेव्हा प्रेम कुठ गेलं होत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता हे सगळे रिकामटेकडे निवडणूक डोळ्यापुढं ठेवून लोकांची मन भडकवण्याचं काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असंही ते म्हणाले.