Sachin Ahir: ठाकरेंना मोठा धक्का! सचिन अहिरांचा शिंदे गटात प्रवेश; राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहिलं?

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा देत पत्रातून कृतज्ञताही व्यक्त केली.

Sachin Ahir: ठाकरेंना मोठा धक्का! सचिन अहिरांचा शिंदे गटात प्रवेश; राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहिलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत सक्रियपणे काम करणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर आता शिंदे गटासोबत दिसल्याने हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

विधान भवनात अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या उपस्थितीमुळे या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अचानक सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ उपसभापतीपदापुरता मर्यादित नसून शिवसेनेतील बदलत्या समीकरणांचाही संकेत मानला जात आहे.

jm

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, सचिन अहिर यांनी केवळ भूमिका बदललेली नाही, तर त्यांनी अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.

राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. "आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे," असे त्यांनी पत्रात नमूद केले. तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे पक्षातील आणि भारतीय कामगार सेनेतील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, "आपण दाखविलेला विश्वास आणि प्रेम कायम राहावे, ही नम्र विनंती आहे. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील," अशा शब्दांत त्यांनी पत्राचा शेवट केला. त्यामुळे राजीनाम्यात कोणताही संघर्षात्मक सूर नसून सन्मानपूर्वक भूमिका घेतल्याचे दिसून येते.

राजकीय स्तरावर या निर्णयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा होती. त्यानंतर ठाकरे यांनी विविध मतदारसंघांचे दौरे सुरू केले होते. अशातच सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक आता अधिकच चर्चेची ठरली असून, सचिन अहिर यांच्या नव्या राजकीय वाटचालीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या घडामोडींचे राज्याच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number