पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाला महिलांचे शोषण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून यामुळे राजकारणही चांगलेच तापले आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो अशोक खरात यांच्यासोबत असल्याचे सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत. यामुळे रुपाली चाकणकरांवर आरोपांची झोड उठतं आहे. यातच पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्याच महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला आहे. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आलेल्या नाहीत, हाच धागा पकडत रुपाली पाटील यांनी फेसबुकवर “राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली!”; अशी उपरोधिक पोस्ट फेसबुकवर केली आहे. नाशिकमधील खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याने त्या जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर राहत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.