Rupali Chakankar: नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी स्वतः ही माहिती जाहीर केली.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, खरात प्रकरणाशी संबंधित कोणत्याही गैरप्रकारात त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. सुरुवातीपासूनच आपण आपली भूमिका स्पष्ट ठेवली असून तपासातून सत्य बाहेर येईल, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, पुराव्याविना होत असलेल्या आरोपांमुळे मनस्ताप होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच राज्याच्या उच्चस्तरीय नेत्यांकडे केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026
यापूर्वीही चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा राज्य सरकारकडे सादर करत वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला होता. आपल्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले होते.
राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी खरात कुटुंबाशी असलेल्या संबंधांबाबतही खुलासा केला. त्यांच्या कुटुंबाने खरात दाम्पत्याला गुरुस्थानी मानलं होतं, मात्र सध्या उघड झालेल्या घटनांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. जे काही घडलं आहे ते अत्यंत घृणास्पद असून अशा प्रकारांना समर्थन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. आगामी काळात या तपासातून काय निष्पन्न होतं आणि या राजीनाम्याचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.